बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वंजारवाडी येथे जुन्या भांडणाच्या कारणातून कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटस्थापनेदिवशी म्हणजेच सोमवारी (दि. 22 सप्टेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास दत्त मंदिरासमोर झालेल्या या हल्ल्यात पाच जण गंभीर जखमी झाले असून सात जणांविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अमोल अण्णा चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ऋतिक उर्फ गुड्या मुळिक, ओम अर्जुन कुचेकर, अली मुजावर, दिपक भोलनकर, रवी माने, शुभम वाघ आणि तेजस हजारे या सात जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जखमींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
- सुनिल गोरख चौधर
- अमोल अण्णा चौधर
- भारत गोकुळ चौधर
- सागर चंद्रकांत चौधर
- आदित्य सर्जेराव चौधर
फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने फिर्यादी व त्यांचे नातेवाईक रासीन येथून देवीची ज्योत घेऊन वंजारवाडी येथील दत्त मंदिरासमोर आले होते. मंदिरासमोर पूजा पाठ व पारंपरिक वाद्य वादन सुरू असताना रात्री साडेआठच्या सुमारास एक चारचाकी गाडी तेथे येऊन थांबली.
गाडीतून उतरलेले आरोपी ऋतिक मुळिक, ओम कुचेकर, अली मुजावर, दिपक भोलनकर, रवी माने, शुभम वाघ आणि तेजस हजारे यांच्या हातात लोखंडी कोयते व चाकू होते. त्यांनी मंदिरासमोर उभ्या असलेल्या फिर्यादीसह त्यांच्या भावंडांवर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात पाच जण गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर तातडीने कारवाई करत पोलिसांनी शुभम वाघ, अली मुजावर आणि ओम अर्जुन कुचेकर या तिघांना ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असून बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील हे करीत आहेत.

0 Comments